मुंबई – चाणाक्ष विकेटकीपर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या महिंद्रसिंग धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्यापाठोपाठ फलंदाज सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनीने सोशल मिडियात एक व्हिडिओ प्रसारित करुन तर रैनाने सोशल मिडियात पोस्ट टाकून निवृत्तीची वार्ता चाहत्यांसह सर्वांना दिली आहे. यावेळी धोनी स्वतः भावूक झाला. त्याच्या या घोषणेनंतर देशभरात त्याचे चाहतेही अत्यंत भावूक झाले आहेत. त्याचे मोठे पडसाद सोशल मिडियात दिसून येत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा होती. अखेर त्याने १५ ऑगस्टच्या दिवशीच चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने पोलस्ट केलेल्या व्हिडिओत ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हे गीत आणि त्यासोबत त्याचा क्रिकेटमधील प्रवासाचे काही क्षण आहेत. खासकरुन माजी कर्णधार सौरभ गांगुली, मास्टर ब्लास्टर सिचन तेंडूलकर, राहुल द्रविड, युवराज सिंह यांच्यापासून विराट कोहली पर्यंत सर्व नवे जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या आठवणी आहेत. हा व्हिडिओ अतिशय बोलका आहे. या व्हिडिओखालीच त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. भारतीय संघासह क्रिकेट विश्वासाठी त्याचे मोठे योगदान राहिले आहे. त्याच्या आयुष्यावर आधारीत हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्याच्या कार्यकतृर्त्वामुळेच तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच्या निवृत्तीने एक अष्टपैलू खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडला आहे.
दरम्यान, आघाडीचा फलंदाज सुरेश रैनानेही अनपेक्षितपणे निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या निर्णयानंतर रैनानेही सोशल मिडियात पोस्ट टाकली आणि मी सुद्धा धोनी बरोबरच्या प्रवासात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे.