मुंबई – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले खरे पण ते परतल्यापासून सर्वच काँग्रेस नेते टेन्शनमध्ये असल्याची बाब समोर आली आहे. पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आल्याने या बैठकीला उपस्थित सर्व वरिष्ठ नेते सावध झाले आहेत. त्यामुळेच काँग्रेसची पूर्वनियोजित राज्यपालांची भेट आज होते की नाही याबाबत साशंकता आहे.
मला कोरोनाची लागण झाली असून मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. मला कुठलेही लक्षणे नाहीत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी ट्विटरवरुन केले. हे ट्वीट पाहून महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित सर्व नेते व मंत्र्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. बांधकाम मंत्री चव्हाण हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत.