बिजींग – जगप्रसिद्ध उद्योजक आणि अलिबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा अखेर सर्वांसमोर आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते गायब झाल्याच्या वार्ता जगभरात प्रसारित झाल्या होत्या. ते कुठे होते आणि काय करत होते याचा काहीही खुलासा झाला नसला तरी ते सर्वांसमोर आले आणि त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामुळे जॅक मा हे जिवंत असून सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीन सरकारने अलिबाबा उद्योगावर कारवाई सुरू केल्याने हा उद्योग संकटात आला होता. त्यातच जॅक मा गायब झाल्याने कंपनीचे गुंतवणूकदार प्रचंड धास्तावले होते. मात्र, जॅक मा हे बुधवारी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. त्यामुळे अलिबाबा कंपनीचे बाजारातील मूल्य थेट ५८ अब्ज डॉलरने वाढले आहे. केवळ कंपनीचे प्रमुख सुरक्षित असल्याचे पाहून गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पुन्हा कंपनीवर विश्वास दर्शविला आहे. त्यामुळेच कंपनीला तुफान कमाई झाली आहे.