मुंबई – महानायक अमिताभ बच्चन यांची एनर्जी बघून त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. कारण वयाच्या ७८ व्या वर्षीही ते ज्या पद्धतिने काम करतात ते तरुणांनादेखील लाजविणारे आहे. त्यातही व्यस्त वेळापत्रकात ते सोशल मिडीयावरही एक्टीव्ह आहेत. सध्या ते आपल्या आयुष्यातील अनेक वेगवेगळे अनुभव सोशल मिडीयावर शेअर करीत आहेत. असाच एक किस्सा सांगताना त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या डोळ्यात पहिल्यांदा कसे पाणी बघितले याची आठवण सांगितली आहे.
अमिताभ यांचे ट्वीटरवर ४५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यावर आनंद व्यक्त करताना त्यांनी एक छायाचित्र ट्वीट केले आहे. यात ते वडील हरिवंशराय बच्चन आणि मुलगा अभिषेक याच्यासोबत दिसत आहेत. त्याचवेळी त्यांनी १९८३मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली’च्या शुटींग दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. या शुटींगदरम्यान ते जखमी झाले होते आणि रुग्णालयात जीवन-मृत्यूचा संघर्ष करून परत आले होते. ते ट्वीटमध्ये म्हणतात, ‘आपले धन्यवाद जास्मिन. अर्थात हे छायाचित्र बरीच पुढची कहाणी सांगणारे आहे. हा तो क्षण आहे जेव्हा मी कुलीच्या घटनेनंतर मृत्यूवर मात करून परतलो होतो. हा पहिला प्रसंग होता जेव्हा मी आपल्या वडिलांना रडताना बघितले होते. चिंताग्रस्त अभिषेक माझ्याकडे बघत होता.’
काय झाले शुटींगमध्ये…
चित्रपटात एक फायटींगचा प्रसंग होता. त्याचे शुटींग सुरू असताना अमिताभ आणि पुनीत इस्सार यांच्यात जोरदार फायटींग दाखविण्यात आली होती. या प्रसागादरम्यान पुनीत इस्सारने अमिताभला खोटेनाटे मारायचे होते. पुनीत केवळ मारायची एक्टींग करतील आणि अमिताभ टेबलवर जाऊन पडतील, असा हा सीन होता. मात्र शॉट मिस झाला आणि चुकीने टेबलचा कोपरा अमिताभच्या पोटाखाली लागला. त्यात बीग बी गंभीर जखमी झाले. पोटाला आणि आतड्यांमध्ये गंभीर दुखापत झाली. ब्रीच कॅंडीमध्ये आठ तास शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर बरेच दिवस उपचार चालला. प्रकृती खालावत असल्यामुळे देशभरातील चाहते प्रार्थना करू लागले होते.