नवी दिल्ली – सुप्रसिद्ध तेलगू अभिनेत्री आणि माजी खासदार एम. विजयशांती यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे. रविवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेतली होती. त्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाचा अंदाज बांधला जात होता. त्याप्रमाणे सोमवारी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
तेलंगाणात फायदा
अमित शाह यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर तेलंगणातील भाजप नेता विवेक वेंकटस्वामी यांनी सांगितले की, तेलंगणाच्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल. येथील निवडणुकीबाबत पक्ष जे काही निर्णय घेईल, त्यात विजयशांती यांची प्रमुख भूमिका असेल, असेही ते म्हणाले. विजयशांती पुन्हा पक्षात आल्याने येथील निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदाच होणार आहे. तेलगू अभिनेत्री खुशबू नंतर विजयशांती ही दुसरी अभिनेत्री आहे, जिने काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे.
राजकीय प्रवास भाजपपासूनच
विजयशांती यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनता पक्षातूनच केली होती. १९९८ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. तेंव्हा महिला आघाडीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेलंगणा आंदोलनाच्या वेळेस त्यांनी राजीनामा देत, स्वतःचा पक्ष स्थापन केला. मात्र, २००९ मध्ये त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षात तो विलीन केला. तर २०१४ मध्ये त्यांनी टीआरएसला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.