कोलकता : पश्मिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉंग्रेसला शनिवारी आणखी एक मोठा झटका बसला असून माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह तृणमूलचे दोन अन्य आमदार आणि तीन वरिष्ठ नेते असे एकूण सहा जण राजीनामा देऊन अनौपचारिकरित्या भाजपमध्ये सामील झाले.
अमित शहा यांनी तृणमूलच्या नेत्यांचे पार्टीत स्वागत केले. तथापि, तृणमूलचे हे सर्व बंडखोर नेते बंगाल दौर्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हातात घेतील. माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासमवेत शनिवारी दिल्लीत भेटलेल्या तृणमूल नेत्यांमध्ये शहा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन डालमिया यांची मुलगी आणि तृणमूलचे आमदार वैशाली दालमिया, हुबळीचे आमदार प्रबीर घोषाल आणि हावडाचे माजी नगराध्यक्ष रथिन चक्रवर्ती , नादियातील तृणमूलचे माजी आमदार पार्थ सारथी चट्टोपाध्याय आणि तृणमूलचे नेते आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांचा समवेश आहे.
दरम्यान, शहा दोन दिवसांच्या बंगाल दौर्यावर शुक्रवारी रात्री उशिरा येणार होते, मात्र, शाह यांचा बंगाल दौरा अचानक रद्द झाल्यानंतर तृणमूलच्या बंडखोर नेत्यांना शनिवारी कोलकाताहून दिल्ली येथे विशेष चार्टर्ड विमानाने बोलावण्यात आले. तृणमूलचे सर्व नेते चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल राय आणि राष्ट्रीय सरचिटणीस आणि बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात तृणमूलचे हे सर्व नेते चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचले. यानंतर तृणमूलचे नेते शहा यांच्या घरी जाऊन भाजपमध्ये दाखल झाले. इकडे, शाह यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा सर्व नेते कोलकाताला परतले.
शहा यांचा बंगाल दौरा रद्द झाल्यानंतर आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी रविवारी येथे येत आहेत. हावडा येथील डोमुराजाला मैदानावर भाजपाच्या योगदान मेळाव्यात त्या सहभागी होणार आहेत. हे सर्व नेतेही या वेळी उपस्थित असतील. दरम्यान, स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत तृणमूल कॉंग्रेससह विविध पक्षांचे नेते भाजपमध्ये येऊ शकतात.