कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर तृणमूल काँग्रेस पक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढत आहेत. कारण पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार सोनाली गुहा यांनी विरोधी भूमिका घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय आणि दक्षिण २४ परगणा येथील पक्षाच्या चार वेळा आमदार असलेल्या सोनाली गुहा यांना या वेळी तिकीट देण्यात आलेले नाही. त्यामुळे आमदार गुहा म्हणाल्या की, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांच्याशी चर्चा करून आपल्या भविष्याबाबतची रणनीती ठरवतील. टीएमसीमध्ये माझी गरज संपली आहे. त्या अगोदर रात्री मी दीदीच्या फोनची वाट पहात राहिली, मात्र त्या माझ्याशी एकदासुद्धा बोलल्या नाहीत.
मला तिकीट का देण्यात आले नाही आणि कोणत्या परिस्थितीत माझे नाव कापले गेले, ते किमान एकदा तरी त्यांना सांगायला हवे होते. मला विश्वासात घेण्यात आले नाही. मी यावेळी निवडणूक लढवणार नाही, परंतु मला नवीन पक्षासाठी काम करायचे आहे. जिथे मला लागेल तिथे मी भाजपच्या प्रचारासाठी जाईन.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी राज्यातील २९१ विधानसभा जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून तृणमूल कॉंग्रेसचे अनेक आमदार, एक खासदार आणि बरेच नेते यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.