चांदवड- तालुक्यातील कानमंडाळे येथे पोलिसांनी छापा टाकून तुरीच्या शेतात गांजाची तब्बल २३० अवैध झाडे व ४६ हजाराचा माल जप्त केला आहे. नाशिक, वडनेरभैरव आणि वडाळीभोईच्या पोलिसांनी ही संयुक्तिक कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेवरून सध्या जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी वडनेरभैरव व चांदवड परिसरात होणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाईसाठी पथक तयार केले.
शिरवाडे भागात पेट्रोलिंग करीत असताना कानमंडाळे (ता.चांदवड) येथे दत्तू चौधरी या शेतकऱ्याने तुरीच्या पिकात गांजा लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ नाशिक, वडनेरभैरव व वडाळी पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून चौधरी यांच्या शेतातील २३० गांजाची (नऊ किलो ३९० वजनाची) रोपे जप्त केली. तसेच संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहायक पोलिस निरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक गुजर, हवालदार गोसावी, चव्हाणके, नाईक, वाघ, मार्तंड, खांडेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.