कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या काढा घेण्याचे प्रचंड पेव फुटले आहे. पण, ते नक्कीच हितकारक आहे का? कुणीही, केव्हाही आणि कसाही काढा घेऊ शकतो का? आयुर्वेदशास्त्रात याविषयी नक्की काय सांगितले आहे, हे सांगणारा हा लेख…
डाॅ. नीलिमा राजगुरू (एम.डी.आयुर्वेद, नाशिक)
पुर्वी रूग्ण वैद्याकडे आला की त्याला काढा म्हणजे काय हे समजावून सांगणे आणि सरते शेवटी त्याला तो घ्यायला राजी करणे, हे एक दिव्यच असायचे. पण आता या काढ्यांचे पेवच फुटले आहे. आयुष काढा, युनानी काढा, मालेगांव काढा शिवाय व्हाॅटस्ॲप सारख्या असंख्य सोशल मिडीयावर उपलब्ध असलेले काढे. या सर्वांनी वैद्यांचाच घाम काढला आहे. यातील कोणता ना कोणता काढा प्रत्येक जण घेत आहे. हल्ली रूग्ण तपासणीसाठी आला आणि काय काय होते हे सांगायला लागला की, सर्वप्रथम त्याला काय काय काढे, औषधे घेतो आहेस हेच आधी विचारावे लागते. बहुसंख्य रूग्णांमध्ये हल्ली जळजळ, पोटात आग पडणे, लघवी, संडासला आग होणे, अशी लक्षणे दिसून येत आहेत. हा सर्व सेल्फमेडिकेशनचा (म्हणजे स्वतःहूनच कोणतेही काढे व कितीही घेण्याचा) परिणाम आहे.
मग आम्ही ही प्रतिबंधात्मक औषधी घ्यायचीच नाही का? असा प्रश्न समोर येतो. तर हे काढे तुम्ही जरूर घ्या, पण वैद्यांच्या सल्ल्यानेच. कारण आयुर्वेदात औषधोपचार करतांना रूग्णाची प्रकृती, वय, ऋतू, रुग्ण जिथे राहतो तो प्रदेश, वेळ, काळ असे सर्व लक्षात घ्यावे लागते. कोरोनाने कफ होतो, घसा खवखवतो अशी लक्षणे लक्षात घेऊन लवंग, दालचिनी, मीरे, आले असे घटक असलेले काढे घेतले जातात. हे सर्व पदार्थ उष्ण व तीक्ष्ण आहेत. हे काढे रोज घेतल्याने शरीरातील उष्णता व पित्त वाढू शकते. विशेषत: पित्त प्रकृतीच्या व्यक्ती व तरूण मुले यांना मोठा त्रास होतो.
काढा घेतांना त्या व्यक्तीचे अग्नीपरीक्षण महत्वाचे आहे. म्हणजे त्याला भूक कशी व किती वेळाने लागते? पचन कसे होते?मलप्रवृत्ती कशी व केव्हा होते? हे सर्व परीक्षण आयुर्वेद तज्ज्ञच करु शकतो. एखाद्या व्यक्तीची भूक मंदावलेली असेल तर त्याला काढ्या पेक्षा हिम, फांट या स्वरुपात औषध द्यायला पाहिजे. कारण हे पचायला काढ्यापेक्षा हलके आहे. अनुक्रमे गार व गरम पाण्यात औषधी भिजवून हिम व फांट तयार करतात. कोणाला, कोणते औषध द्यायचे हे तज्ज्ञ वैद्यानेच ठरवायला पाहिजे.
काढा करायची पद्धत
काढा म्हणजे चहासारखाच करायचा आहे, असा एक गैरसमज सध्या रुढ झाला आहे. दोन कप पाण्यात २ चमचे चहा पावडर टाकून उकळले की झाला चहा तयार. (खरं तर असा उकळून चहा करणे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. चहा पण वर सांगितलेल्या फांट या प्रकारासारखा, गरम पाण्यात भिजवून तयार करतात) अशाच अशास्रीय पद्धतीने हल्ली काढा करून घेतला जातो. पण शास्रोक्त पद्धतीने काढा करतानाची पद्धत काढ्याच्या द्रव्यांनुसार बदलते. त्यात किती पाणी टाकायचे? तो कुठल्या भांड्यात, किती वेळ उकळायचा? याचे पण एक शास्त्र आहे. द्रव्याच्या चारपट, आठपट किंवा कधी कधी १६ पट पाण्यात काढा करायचा असतो. हे त्या त्या द्रव्याच्या गुणधर्मावर ठरते. तसेच काही सुगंधी द्रव्ये असतात. त्यांचा काढा न करता वर उल्लेख केल्याप्रमाणे हिम किंवा फांट करतात. नाहीतर त्यांचा गुण येत नाही. त्यात काही उडनशील द्रव्ये असतात. काढा केला तर ती उडून जातात. मग त्यांचे औषधी गुणधर्म कसे काम करतील?
काढे किती दिवस घ्यायला पाहिजेत? आता करोना अजून आहेच मग काढा चालूच ठेवला तर काय बिघडते? असा विचार करुन गेली ४-५ महिने रोज काढा घेणारी मंडळी आहेत. हे काय आयुर्वेदिकच आहे त्याला काही साईडइफेक्टस् नसतात, असा सर्वांचा गोड गैरसमज आहे. पण असे मुळीच नाही. त्यामुळे हे काढे जरूर घ्या, पण ते तज्ज्ञ वैद्याकडूनच घ्या.
नुसते हे काढे पिऊन, आयुर्वेदीक औषधे खाऊन प्रतिकार शक्ती वाढणार नाही. आयुर्वेदातील प्रतिकार शक्ती ही संकल्पना खूप व्यापक आहे. त्याबद्दल नंतर जाणून घेऊच. त्यामुळे सध्यातरी आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच काढा, औषधे घ्या आणि स्वस्थ रहा.
(मो. ९४२२७६१८०१)