नवी दिल्ली – विविध भाषा, धर्म, परंपरांचा देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. त्यामुळेच कोणताही सण असला तरी ती साजरा करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. होळी साजरा करण्याची पद्धतही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आहे. यातील एक पद्धत ऐकून तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, नव्हे अंगावर काटाच येईल. कारण येथे चक्क विंचवांच्या सहाय्याने होळी खेळली जाते.
उत्तर प्रदेशातील एक शहर कानपूर. त्यातील एक भाग इटावा. या इटावा भागातील एका गावात ही अजिबोगरीब प्रथा पहायला मिळते. फाल्गुन महिना आणि विशेषत: होळी आली, होळीची गाणी वाजू लागली की मोठ्या संख्येने विंचू बिळातून बाहेर येतात. आणि मग लहान मोठे सारेचजण हे विंचू हातात घेऊन एकमेकांवर फेकतात, आणि होळी साजरी करतात.
विंचू हा विषारी प्राणी असल्याने त्याचे नाव घेतले तरी आपल्याला धडकी भरते. पण इथे तर विंचू हे आपले मित्र असल्यासारखेच त्यांच्यासोबत ही होळी खेळली जाते. विशेष म्हणजे, हे विंचू कोणालाही डसत नाहीत. सगळ्या गोष्टी तर्काच्या, विज्ञानाच्या निकषांवर घासून मग त्यावर विश्वास ठेवण्याच्या काळात रहस्यकथा वाटावी अशी ही गोष्ट असली तरी ती खरी आहे. मुलेही अगदी बिनदिक्कतपणे या विंचवांना हात लावतात. इटावातील सौंथना गावातील ही प्रथा शेकडो वर्षांपासून अशीच सुरू आहे.
या गावाच्या बाहेर एक भैंसान नावाची छोटी टेकडी आहे. तेथे अनेक दगड आहेत. इतर दिवशी कधीही तुम्ही हे दगड उचलून पाहिलेत तर तुम्हाला काहीही दिसणार नाही. पण, होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही या टेकडीवर गेलात आणि होळीची गाणी म्हणायला सुरुवात केलीत, की अचानक शेकडोंच्या संख्येने विंचू बाहेर पडतात.
जिथे कालपर्यंत एकही विंचू नव्हता, तिथे एवढे विंचू येतात कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडतो. हे विंचू कोणालाच त्रास देत नाहीत. या गावातील ज्येष्ठ सांगतात की, हे विंचू होळीच्या दिवशी कोणालाच त्रास देत नाहीत. पण होळीनंतर जेव्हा हे विंचू सापडतात, तेव्हा मात्र ते हमखास डसतात. आणि त्यांच्या विषाचा त्रासही होतो. शिवाय, या टेकडीवरील दगड कोणी घरी ठेवण्यासाठी नेला तर घरातही विंचू निघतात.