नवी दिल्ली – जगाच्या इतिहासात अनेक श्रीमंत राजांचा उल्लेख असून त्यांच्याकडे संपत्तीचा खूप मोठा साठा होता. त्यापैकी काही राजांच्या संपत्तीचा तर अंदाज करणे फार कठीण होते. यात टिम्बकटू देशाचा राजा मनसा मुसा जगातील सर्वाधिक श्रीमंत राजा मानला जात असून आजवर त्याची संपत्ती नेमकी किती होती हे कळले नाही.
सध्या, टिम्बकटू हे आफ्रिकेतील माली या देशामधील एक शहर असून पूर्वी येथे प्रचंड सोन्याचे साठे होते. त्यावेळी माली देशावर मनसा मुसा याचे राज्य होते. या राजाच्या कारकिर्दीत सुमारे एक हजार किलो सोन्याचे उत्पादन झाले, असे म्हणतात. वास्तविक, मनसा मूसा याचे खरे नाव मुसा कीता (प्रथम ) होते. पण राजा झाल्यानंतर त्याला मनसा म्हटले गेले.
मानसा म्हणजे राजा. मूसा सुलतान हा इतका श्रीमंत होता की, त्याचा आपल्याला अंदाज येऊ शकत नव्हता. आजच्या काळातील मॉरिटानिया, सेनेगल, गॅम्बिया, गिनी, बुर्किना फासो, माली, नायजर, चाड आणि नायजेरिया ही त्याकाळी मुसाच्या राज्याचा भाग होते.
मनसा मुसा १३१२ मध्ये माली साम्राज्याचा राज्यकर्ता झाला. त्यानंतर सुमारे २५ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने अनेक मशिदी बांधल्या. त्यापैकी काही आजही अस्तित्वात आहेत. मनसा मूसाशी संबंधित एक कथा जगभरात प्रसिद्ध आहे.
१३१३ मध्ये मानसा मुसा मक्काच्या प्रवासाला निघाला. यावेळी त्याच्या काफिल्यात सुमारे ६० हजार लोक होत. त्यापैकी १२ हजार केवळ त्याचे वैयक्तिक सहकारी व नोकर होते. याशिवाय घोड्यावर बसलेल्या मुसाच्या मागे – पुढे ५०० लोकांचे पथक होते आणि प्रत्येकाच्या हातात सोन्याचे भाले (काठी) होते.
मुसाच्या या ताफ्यात ८० उंटांची तुकडीही होती आणि प्रत्येक उंटावर १३६ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा होत्या. मनसा मूसा इतका उदार होता की, इजिप्शियन राजधानी कैरो येथून जात असताना त्याने गरिबांना इतके पैसे दान केले की, त्या भागातील लोकांनी या पैशातून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्याने टंचाई निर्माण होऊन महागाई वाढली.
जेव्हा मानसा मूसाने गरिबांमध्ये सोन्याचे वाटप केल्याची चर्चा युरोपला पोहोचली, तेव्हा ते लोक माली साम्राज्यात यायला लागले. शेवटी, त्याच्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना खात्री पटली की, मानसा मूसाकडे अफाट संपत्ती आहे.