पॅरिस – काही दिवसांपासून मंगळावर अंतराळ यान उतरल्याच्या आणि तेथील फोटो पाहून तुम्हालाही तिथे जायची इच्छा होते आहे का? तसंही बघितलं तर आकाशात पक्ष्यांसारखं उंच उडायला कोणाला नाही आवडत? तुम्हालाही जायचं आहे का असं फेरफटका मारायला, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
युरोपियन अंतराळ एजन्सी (ईएसए) ही संधी देते आहे. तब्बल ११ वर्षांनी नवीन अंतराळप्रवाशांची भरती करण्यात येत आहे. पण, यासाठी प्रेशर आणि शून्य गुरूत्वाकर्षणात रहायची तुमची तयारी असायला हवी. याची जर तुम्हाला शंभर टक्के खात्री असेल, तर ही संधी निश्चितच तुमच्यासाठी आहे. फक्त या एजन्सीचे जे काही निकष आहेत, ते तुम्ही पूर्ण करायला हवेत.
अंतराळयात्री बनण्यासाठी इच्छुकांकडे नॅचरल सायन्स, इंजीनिअरिंग, गणित किंवा कॉम्प्युटर सायन्समधील मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, यात महिला आणि दिव्यांगांना प्राधान्य दिले जात आहे.
ईएसएचे महासंचालक जेन वॉर्नर सांगतात, आम्हाला चंद्र तसेच मंगळावर जायचे आहे. यासाठी आम्हाला भविष्यात चांगल्या अंतराळयात्रींची गरज आहे. यासाठी आम्हाला आतापासूनच मोठ्या प्रमाणावर विचार करावा लागणार आहे. याचीच पहिली पायरी म्हणून ही संधी दिली जाणार आहे.










