येत्या १० सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने मानसोपचारतज्ज्ञ डॉ हेमंत सोननीस यांचा हा विशेष लेख…..
१. आपण, आपले कुटुंब, आपले मित्र आणि आपल्या सहकाऱ्यांच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहण्यासाठी एक मिनिट घ्या.
२. इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मिनिट घ्या आणि आपल्याला काही वेगळे असल्याचे आढळल्यास संभाषण सुरू करा.
३. आपण स्वतः आणि इतर लोक अशा दोघांसाठी कोणती मदत उपलब्ध आहे हे शोधण्यासाठी एक मिनिट घ्या.
१० सप्टेंबर हा जागतिक स्तरावर ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून पाळला जातो. आत्महत्या हा एक अतिशय गंभीर मानसिक आरोग्य विषयक, कौटुंबिक, सामाजिक, जागतिक प्रश्न आहे.
ठळक आकडेवारी
१. जगभरात दरवर्षी दहा लाख लोक आत्महत्येने मरतात.
२. रोज तीन हजार लोक आत्महत्येने आपला जीव गमावतात.
३. यापेक्षा पंचवीस पटीने जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात.
४. त्यापेक्षा खूप जास्त जणांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोळत असतात
५. एकूण मृत्यूच्या कारणांपैकी वीस सर्वात जास्त प्रमाणात आढळणार्यांत एक आहे आत्महत्या
६. एकूण मृत्यूंपैकी १.५% मृत्यू आत्महत्येने होतात.
आत्महत्येची कारणे
आत्महत्येची खूप कारणं असू शकतात. याला जेनेटीक कारण आहे. काही ठराविक प्रकारची जनुके एखाद्याच्या शरीरात असतील तर आत्महत्या करण्याची प्रवृत्ती जास्त असते असे संशोधनाअंती लक्षात आले आहे. त्याचबरोबर मेंदूत काही ठराविक न्यूरोट्रान्समीटर्स किंवा तत्सम काही घटकांचे प्रमाण कमी असेल तरी सुद्धा आत्महत्येचा धोका जास्त असतो असे लक्षात आले आहे. काही प्रमाणामध्ये अनुवंशिकता देखील यात आढळून येते.
या सर्व नैसर्गिक गोष्टी अधिक त्या व्यक्तीचा स्वभाव गुणधर्म, संकटांमध्ये वागण्याची एक नैसर्गिक पद्धत, घरातील सदस्य , मित्रपरिवार यांचा असलेला आधार, इतर काही अनुभव, काही अडचणी इत्यादी सर्व घटकांची प्रक्रिया होऊन एखाद्या व्यक्तीमध्ये आत्महत्या करण्याचे विचार किंवा प्रयत्न होण्याची शक्यता वाढते किंवा निर्माण होते.
मानसिक आजार असेल तर आत्महत्येचा धोका वाढतो. विशेषकरून डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनियासारख्या आजारांमध्ये आत्महत्येचे प्रयत्न जास्त प्रमाणात दिसतात. आणि योग्य उपचार न झाल्यास अनेक व्यक्तींना आत्महत्येने जीव देखील गमवावा लागतो. दारू किंवा इतर व्यसनांच्या अंमलामुळे देखील आत्महत्येचे विचार आणि प्रयत्न जास्त प्रमाणात दिसून येतात.
आत्महत्या थांबविण्यासाठी काय करू शकतो
सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे की आत्महत्येचे विचार येणे किंवा तसा प्रयत्न करणे हा भेकडपणा नाही. हा घाबरटपणा नाही. किंवा ही मनाची कमजोरी नाही . त्या व्यक्तीला दूर ढकलून किवा कमी लेखून प्रश्न सुटणार नाही.
मानसिक आजार असल्यास त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांना भेटणं आणि त्यांची योग्य उपचार करणं गरजेचं आहे .योग्य उपचार झाल्यास आत्महत्येसारखे गंभीर दुष्परिणाम टाळणे निश्चितच शक्य आहे. दारू किंवा इतर व्यसनांच्या असलेला धोका लक्षात घेता त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दारू पिल्याने कोणताही मानसिक ताण किंवा टेन्शन कमी होत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा मित्रमंडळींकडून टेन्शन कमी होण्यासाठी दारू पिण्याचा सल्ला दिला जातो आणि हा अतिशय चुकीचा समज आपल्या समाजामध्ये अज्ञानामुळे दिसून येतो.
अभ्यास परीक्षा नोकरी व्यवसाय आर्थिक जबाबदाऱ्या नातेसंबंध इत्यादींमध्ये अनेकदा मानसिक ताण तणाव वाढण्याची शक्यता असते अशा सर्व ठिकाणी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे .योग्य प्रकारे आपल्या भावना व्यक्त झाल्यास मदत घेण्यास सहज शक्य होते आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गापर्यंत जाण्याआधी आपल्याला मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावू शकतात.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचं या वर्षीचं ब्रीदवाक्य आहे ‘एकमेका साह्य करू आत्महत्या थांबवू’ (Working together to prevent suicide) असे आहे.
आत्महत्या रुपी ड्रॅगनला थोपविण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही भूमिका पार पाडू शकतो.
जर आपल्याकडे कोणी स्वतःच्या मनातील ताणतणाव व्यक्त करत असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांची टिंगल करू नका. चेष्टा करू नका. त्यांना कमी लेखू नका. योग्य मदत आणि मार्गदर्शन करा.
जर जास्तच त्रास वाटत असेल तर मानसोपचार तज्ञांचं मार्गदर्शन घेण्याचा त्यांना आवर्जून सल्ला द्या.
आपल्यापैकी प्रत्येक जण एक मित्र मैत्रिण सहकारी शिक्षक पालक नातेवाईक शेजारी या नात्याने आत्महत्येसारखा गंभीर विषय आणि त्याचं समाजातलं प्रमाण कमी करण्यासाठी निश्चितच लहान मोठा वाटा उचलू शकतो.