हर्षल भट, नाशिक
सध्या तरुणाईचा कल डिजिटल युगाकडे झुकला असतांना अध्यात्म, अभंग, भारूड यांनाही तेवढेच महत्व देणारी तरुण मंडळी साहित्यक्षेत्रात काम करत आहेत. पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील तेजस्विनी गांधी हिने देखील अनोख्या विषयाद्वारे वाचकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियाचा सदुपयोग करत ‘समर्थ रामदास स्वामीं’यांच्या मनाच्या श्लोकाचे विवेचन करत असून वाचकांनी त्यास पसंती दिली आहे. तरुण पिढीला रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा अर्थ समजावा, त्यातील भावार्थ रोजच्या जीवनात आणावा यासाठी तेजस्विनी आग्रही असून फेसबुकद्वारे तिने १७१ श्लोकांचे विवेचन पूर्ण केले आहे. श्लोकांतील अवघड वाटणाऱ्या गोष्टी समजून न घेता बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा वेळी वाचुन सोप्या पद्धतीने अर्थ समजून घेतल्यास लवकर आकलन होत असते अशी विचारधारणा मांडत तेजस्विनीने विवेचनास सुरवात केली.
फर्ग्युसन कॉलेजयेथे शिक्षण घेत असतांना तेजस्विनीने श्लोकांच्या विवेचनास सुरवात केली. रोज एका श्लोकाचे विवेचन ती फेसबुकर करत असते. आजच्या तरुण पिढीपर्यंत अभंग, भारूड यांच्या बरोबरच आता मनाच्या श्लोकाचे विवेचन पोहोचावे या उद्देशाने तिने सुरवात केली आहे. रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे असून, साध्या व सोप्या शब्दात तेजस्विनी श्लोकांचे विवेचन करते आहे. आजपर्यंत तिने १७१ श्लोकांचे विवेचन केले आहे. सध्या सोशलमिडियावर तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात लिखाण करत आहे. लेख, कविता असे निरनिराळे साहित्य तरुण मंडळी लिहीत आहेत. तेजस्विनीच्या अनोख्या धाटणीच्या लिखाणाचे कौतुक सध्या फेसबुकवर होत आहे. त्याचप्रमाणे तिचे विवेचन वाचणाऱ्यांमध्ये तरुणांचा सर्वाधिक सहभाग असल्याचे दिसून आले आहे. तरुण वयात लागलेली अध्यात्माची गोडी आणि त्याचा अनोख्या पद्धतीने होणार प्रसार कौतुकास्पद आहे. तेजस्विनीच्या फेसबुक वॉलवर तिने केलेल्या ‘मनाच्या श्लोकांचे’ विवेचन उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तिच्या लिखाणाची दखल जेष्ठ लेखकांनी घेतला आहे. काशिनाथ वर्देकर या श्लोकांचे सुलेखन करत आहेत.
तरुण लेखक सध्या विविध विषयांवर लिखाण करते आहे. समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचे विवेचन करण्याचे मनात आले. तत्काळ अभ्यास करून त्यावर काम सुरू केले. आजपर्यंत १७१ श्लोकांचे विवेचन पूर्ण केले आहे. समर्थांचे विचार त्यांचे तत्व तरुण पिढीला समजावे या उद्देशाने लिखाण सुरू आहे.
– तेजस्विनी गांधी