नाशिक – काँग्रेसचे आमदार निधी वरुन नाराज असले तरी त्यांचा सोबत चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीत तीन पक्षांचे सरकार असल्याने कोणीतरी नाराज होणारच. असे असले तरी सरकार मजबूत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
विविध विषयांच्या आढावा बैठकांनंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी विविध विषयांवर त्यांची मते मांडली.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे गेला हे बरे झाले. नाहीतर मुंबई पोलिसांनी कितीही चांगले काम केले तरीही मुंबई पोलिस कुणाला तरी वाचवित आहेत असाच आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्ष मोठा झाला पाहिजे
काँग्रेस पक्ष हा मोठा आहे. अध्यक्षपद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, अध्यक्ष कोणीही होवो, काँग्रेस पक्ष मोठा झाला पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.
नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला
नाशिक जिल्ह्यात सर्व ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक गल्ली बोळात जाऊन कोरोनाची चाचणी केल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्यात घाबरण्यासारखे काही नाही. रुग्ण वाढत असले तरी देशात नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.
आता नाही तर पुढे शक्य नाही
दमणगंगा खोऱ्यातील पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी नाशिककडे वळवणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले. आता हे पाणी अडवले नाही तर यापुढे ते शक्य होणार नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.