विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दिल्लीतील वसंत विहार भागामध्ये माजी केंद्रीय मंत्री स्व. पी रंगराजन कुमार मंगलम यांची पत्नी किट्टी कुमार मंगलम (७०) यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या गुन्ह्यात दोन आरोपींचा शोध लागला आहे. मात्र तिसरा आरोपी तीन किलो सोने घेऊन फरार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले पी. रंगराजन कुमार मंगलम यांची पत्नी किट्टी कुमार मंगलम ह्या वसंत विहारमध्ये एकट्या राहत होत्या. त्या व्यवसायाने वकील असून त्यांचा मुलगा मोहन कुमार हा राजकारणात आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील अनेक पोलिस पथके आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली-एनसीआर आणि राजस्थान येथे छापा टाकत आहेत. मात्र आरोपी वारंवार त्याच्या लपण्याची ठिकाणे बदलत असल्याने अद्यापही पोलिसांच्या हाती तो लागत नाही.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या राजू या एका आरोपीकडून बॅग आणि कपड्यांची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून दुसरा आरोपी राकेश याच्याकडून किट्टी मंगलमच्या घरातून चोरलेले ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. मात्र तिसरा आरोपी सूरज हा तीन किलोच्या लुटलेल्या संपूर्ण दागिन्यांसह पळून गेला असून अद्यापही फरार आहे. अटक केलेले आरोपी राकेश आणि राजू यांच्या चौकशीदरम्यान हे तिन्ही आरोपी कर्जबाजारी असल्याचे समोर आले आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी चोरी केली होती. एका आठवड्यापूर्वी आरोपींनी दरोडा टाकण्याचा कट रचला होता.