दिंडोरी – शाळा बंद शिक्षण सुरू कार्यक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल व रेडिओ वाटप करण्यात आले आहेत. त्यासाठी शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद शाळा तिसगांव येथील विज्ञान पदवीधर शिक्षक रावसाहेब बहिरु जाधव यांनी पुढाकार घेतला.
नाशिक जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे प्रेरणेने शाळा बंद शिक्षण सुरु हा उपक्रम राबविला जात आहे. अभ्यासू व घरची परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांना मोबाईल व रेडिओ दान केले जात आहेत. यापूर्वीही तिसगांव येथील बाळू पवार यांनी मोबाईल तर सर्व शिक्षकांनी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना अशीच मदत जास्तीत जास्त करणार व मिळवून देणार असल्याचे जाधव म्हणाले. सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव भगरे, दिंडोरी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी प्रणिता कुमावत, केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, मुख्याध्यापक तुकाराम राऊत, पदवीधर शिक्षक शरफोद्दीन शेख व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आदींच्या उपस्थितीत पार पडला.