मुंबई – प्रिव्हेंशन इज बेटर द्यान क्युअर हे आपण कित्येकदा ऐकले आहे, वाचले आहे. मात्र यावर अंमल करण्याचा विचार कुणीच करीत नाही. जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा प्रत्येक पावलावर खिशाला कात्री बसत असते. पण नियमित तपासण्या केल्या तर आजारापासूनच सुटका होऊ शकते. अर्थात आजाराला लांब ठेवण्यावर तोच सर्वोत्तम उपाय आहे. विशेषतः तिशी ओलांडली की वैद्यकीय चाचण्या आवश्यकच आहेत.
आपले वय वाढत जाते तसे शरीराचा बराचसा भाग संथ होत जातो. तसेच अनेक आजारांच्या जाळ्यातही सापडतो. त्यामुळे आपली लाईफस्टाईल कितीही व्यस्त असली तरीही नियमित तपासण्या आणि स्क्रिनिंग अत्यंत आवश्यक आहेत. आपण डायबिटीज, बीपी आणि कोलेस्ट्रॉलच्या तपासण्या करीत असाल, तर एवढ्याने काहीच होत नाही, हे लक्षात घ्या. जर आपले वय तीसपेक्षा जास्त असेल तर खालील सहा चाचण्या अत्यंत आवश्यक आहेत.
ईसीजी – ह्रदयाशी संबंधित आजार कधीच कशाची प्रतिक्षा करीत नाही आणि कुठल्याही क्षणी अंगावर धावून येते. त्यासाठी ईसीजी म्हणजेच इलेक्ट्रो कार्डियोग्राम टेस्टचा उपयोग ह्रदयाशी संबंधित आजार जाणून घेण्यासाठी होतो. या टेस्टच्या माध्यमातून आपण अलर्ट होऊ शकतो.
लिपीड प्रोफाईल – एक लिपीड प्रोफाईल टेस्ट कोलेस्ट्रॉलच्या छोट्यात छोट्या घडामोडींची माहिती देत असते. यातूनही ह्रदयाशी संबंधित आरोग्याची माहिती मिळत असते. तिशी ओलांडल्यावर दर दोन वर्षांनी ही चाचणी आवश्यक आहे. विशेषतः आपल्या घरात कुणी डायबिटीज किंवा ह्रदयविकाराशी संबंधित आजाराने ग्रस्त असेल तर अत्यंत आवश्यक आहे.
पॅप स्मियर – महिलांमध्ये तिशीनंतर नियमित ही चाचणी आवश्यक आहे. ही टेस्ट गर्भाशयातील बदलांबाबत सूचना देते. बरेचदा गर्भाशयाचा कर्करोग किंवा इन्फेक्शनपासून वाचविण्याचाही प्रयत्न करते.
लिव्हर – लिव्हर केमेस्ट्री टेस्ट ही लिव्हर किती स्वस्थ आहे हे सांगत असते. सोबतच हिपीटायटीससारख्या कितीतरी इन्फेक्शनची माहिती देते. तिशीनंतर वर्षातून एकदा ही चाचणी आवश्यक आहे.
कोलोनस्कोपी – पुरुषांसाठी वयाच्या ४५-५० नंतर कोलोनस्कोपी टेस्ट आवश्यक आहे. जर घरात कुणाला कोलोनचा कर्करोग असेल तर त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ही चाचणी मदत करते.
जेनेटिक टेस्ट – कोणत्याही आजाराचे संकेत मिळायला लागले की जेनेटिक टेस्ट अत्यंत आवश्यक आहे. या टेस्टच्या माध्यमातून भविष्यातील आजारांची माहिती मिळत असते. त्यामुळे जोखीम स्वीकारण्यापेक्षा पहिलेच उपाय करणे शक्य होत असते.