मुंबई – जवळपास जगावर राज्य करणारे जी मेल गुरुवारी (२० ऑगस्ट) जवळपास तीन तास ठप्प झाल्याने एकच खळबळ उडाली. मेल जाणे किंवा येणे ही सारी प्रक्रियाच बंद पडली. त्यामुळे दैनंदिन कामे जी मेलवर करणाऱ्या सर्वांचीच मोठी गैरसोय झाली. परिणामी, ट्विटरवर नागरिकांनी जी मेलला चांगलेच लक्ष्य केले. काही जणांनी जोरदार टीका केली तर काहींनी त्यांच्या अडचणी सांगत सेवा त्वरीत सुरू करण्याची मागणी केली.
मेलद्वारे काही फाईल जोडून पाठविताना तो मेल जात नाही, सेंट मध्ये दिसत असला तरी तो सबंधितांना मिळालेला नाही, अशा प्रकारच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या. गुगल कंपनीने जी मेलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अतिशय गतिमान आणि वैविध्यपूर्ण असलेला जी मेल वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र, जी मेल कशामुळे ठप्प झाले हे स्पष्ट झाले नाही. जी मेल किंवा गुगलने त्याबाबत खुलासा केला नाही.
हॅशटॅग आणि ट्रेंड
ट्विटरवर #Gmail आणि #GmailDown हे मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाले. त्यात असंख्य ग्राहकांनी तक्रारी केल्या. अनेकांनी तर जी मेलची खिल्ली उडविणाऱ्या पोस्ट टाकल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १० लाख ९ हजार जणांनी या ट्रेंडवर ट्विटरद्वारे प्रतिक्रीया दिली.