मुंबई – कॉमेडी शो ‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे लेखक अभिषेक मकवाना यांनी काल आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांच्या मते मकवाना यांच्यावर मोठे कर्ज होते आणि कर्ज घेतल्यापासून सतत त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. अभिषेक सायबर गुन्हेगारीचा बळी असल्याचे सुद्धा त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
अभिषेक यांना वारंवार फोनवर धमक्या येत असल्याचे कुटुंबीय सांगतात. मात्र अभिषेक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये असा कोणताही उल्लेख नाही. अभिषेक यांच्या मोठ्या भावाच्या मते त्यांना या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नव्हती. दिनांक २७ नोव्हेंबर रोजी अभिषेकने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा कुटुंबाला देणेकऱ्यांचे फोन यायला लागले तेव्हा त्याना याबाबत माहिती झाली.
अभिषेकच्या भावाचे म्हणणे आहे की, “माझ्या भावाच्या मृत्यू नंतर मी त्याचे इमेल्स चेक केले. त्यावरून माझ्या लक्षात आले की त्याला वेगवेगळ्या नंबरवरून फोन कॉल्स येत होते, आणि त्याच्यावर कर्ज फेडण्यासाठी दबाव आणणे सुरु होते. यापैकी एक कॉल बांगलादेशच्या नंबर वरून आला होता तर एक म्यानमारहून आला होता. भारतातील अन्य शहरांतून सुद्धा बरेच फोन कॉल्स आले होते.”
“यावरून मला हे समजले की माझ्या भावाने इझी लोन देणाऱ्या कुठल्याश्या मोबाईल अॅप वरून कर्ज घेतले होते. यात मोठ्या प्रमणावर व्याजदर लागतो. यानंतर मी या व्यवहारांची चौकशी केली तेव्हा मला आढळून आले की माझ्या भावाला गरज नसताना आणि त्याने मागणी केली नसताना देखील काही लोक विविध माध्यमातून पैसे पाठवत होते. या कर्जाचा व्याजदर जवळपास ३० टक्के इतका होता,”
या प्रकारात मुंबई येतील चारकोप पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या नम्बरवर चौकशी करून पोलीस या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.