चेन्नई – तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांंना जागा सोडण्यावरून सत्तारूढ अण्णा द्रमुक आणि विरोधी पक्ष द्रमुकला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते चेन्नईमधील एग्मोर भागातील विधानसभा जागा टीएमएमकेला सोडण्याचा विरोध करत आहेत. तर पीएमकेला पुनामाले आणि गुम्मीडीपुंडी जागा सोडण्याचा विरोध अण्णा द्रमुकमध्ये होत आहे. अण्णा द्रमुकच्या यादीत श्रममंत्री निलोफर कफिल यांचं नाव आल्यामुळेही कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
निलोफर कफिल यांना विरोध
निलोफर कफिल यांना तिकीट दिल्यास वनियाम्बाडीमध्ये अण्णा द्रमुकला मतं मिळणार नाहीत, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. शिवगंगामध्ये मंत्री भास्करन यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक निदर्शनं करत आहेत. अण्ण द्रमुकनं श्रीविलीपुथूर, चेय्यूर आणि चेंगलपेटमध्ये घोषित केलेल्या उमेदवारांना विरोध होत आहे. द्रमुकनं पोनेरी जागा काँग्रेसला दिल्याबद्दल मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. काही जागांबाबतही कुरबुरी सुरू आहेत.
दिनाकरन हे राजू यांच्याविरोधात
जयललिता यांच्या निकटवर्तीय राहिलेल्या शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन अम्मा मक्कल मुनेत्र कळगम (एएमएमके) च्या झेंड्याखाली कोविलपट्टी जागेवर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्याचे माहिती मंत्री कादंबर सी राजू यांच्याविरोधात ते लढणार आहेत. या जागेवर राजू दोन वेळा विजयी झालेले आहेत. एएमएमकेनं गुरुवारी ५० उमेदवारांची यादी जाहीर केली.







