नवी दिल्ली – आयकर विभागाने आयटी एसझेड डेव्हलपरचे माजी संचालक आणि तामिळनाडूमधील स्टेनलेस स्टील पुरवठादार व्यावसायिक यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सुमारे ४५० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली आहे. एवढे मोठे घबाड बघून आयकर विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) रविवारी या कारवाईची माहिती दिली.
सीबीडीटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंबंधी अधिक माहिती देताना सांगितले की, चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि कुडलोर येथील एका पुरवठादाराच्या जागांवर छापे टाकण्यात आले असून आतापर्यंत त्यात ४५० कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले आहे. माजी माहिती तंत्रज्ञान विशेष आर्थिक क्षेत्र (आयटी एसझेड) चे संचालक यांच्याकडून गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचार करून सुमारे १०० कोटी रुपये जमा केल्याचा पुरावा मिळाला आहे. सदर रक्कम माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सदर रक्कम आणखी वाढविली आहे.
आयटी सेझ विकसकाने निर्माणाधीन प्रकल्पाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामाच्या खर्चाचा दावा केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एका प्रोजेक्टसाठी ३० कोटींच्या भांडवली खर्चाचा दावा केला आहे. तसेच या युनिटने २० कोटींचा चुकीचा व्याज खर्च दर्शविला आहे. सखोल चौकशीनंतर चेन्नईच्या स्टेनलेस स्टील पुरवठादाराच्या बाबतीत हा गैकारभार झाल्याचे तथ्य समोर आले. प्रत्येक वर्षी बेहिशेबी किंवा अंशतः हिशेबित साहित्य विक्रीत एकूण विक्रीच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम आकारल्याचे उघडकीस आले होते. आत्ता बेहिशेबी उत्पन्नाची गणना केली जात असून सदर रक्कम अंदाजे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.