चेन्नई – तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्ही. के. शशिकला यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे तामिळनाडूतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलला विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक होणार आहे. एम. के. स्टालिन यांचा द्रमुक पक्ष सत्तेत येऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. एम. के. स्टालिन यांचा डीएमके हा पक्ष सत्ताधारी एआयएडीएमके आणि भाजप युतीच्या विरोधात लढत आहे. निवडणुकीत डीएमकेनं काँग्रेस व इतर पक्षांशी युती केली आहे.
शशिकला यांनी पत्रात म्हटलं आहे, जयललिता जिवंत असतानाही मी कधीही सत्ता किंवा पदावर नव्हते. तिच्या मृत्यूनंतरही मी तसं करणार नाही. राजकारण सोडत असले तरी त्यांचा पक्ष विजयी झाला पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे जाईल, अशी मी प्रार्थना करते. मला कधीही सत्ता, अधिकार किंवा संपत्तीची इच्छा नव्हती. अम्मा आणि तामिळनाडूच्या जनतेची मी नेहमी कृतज्ञ राहीन. एआयएडीएमकेमधून निष्कासित केल्या गेलेल्या व्ही. के. शशिकला २८ जानेवारीला एका बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्या आहेत. तेव्हा त्या सत्ताधारी एआयएडीएमके आणि विरोधी पक्ष डीएमकेला या वेळी विधानसभेत आव्हान देतील, अशी शक्यता होती. अद्याप त्यांनी याबाबत आपले पत्ते उघडले नाहीत.
जयललिता यांचे डिसेंबर २०१६ निधन झाले होते. त्यानंतर एआयएडीएमकेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. पनीरसेल्वम गटानं शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.