चेन्नई ः तामिळनाडूच्या दक्षिण मदुरै विधानसभा मतदारसंघातील ३३ वर्षीय अपक्ष उमेदवार थुलम सरवनन सध्या चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात हेलिकॉप्टर, वर्षाला एक कोटी रुपये, तीन मजल्याचे घर आणि चंद्राची सहल यासह अनेक आश्वासनं दिली आहेत. त्यांच्या जाहीरनामा आणि विचित्र आश्वासानांमुळे एका वेगळ्याच मुद्दयाला वाचा फोडली आहे. त्यांनी जाहीरनाम्याबद्दल एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलताना खुलासा केला.
राजकीय पक्षांडून दिल्या जाणाऱ्या मोफत भेटवस्तू आणि अन्नाच्या मागे धावणार्या लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा माझा उद्देश असल्याचं थुलम सरवनन यांनी सांगितलं. सामान्य आणि विनम्र असणाऱ्या चांगल्या उमेदवाराची निवड व्हावी असं मला वाटतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. सरवनन यांचा निवडणूक चिन्ह कचराकुंडी आहे. हे चिन्ह खोट्या आश्वासनांचं प्रतीक आहे. लोकं कधीही पूर्ण न होणाऱ्या खोट्या आश्वासनांना बळी पडून मतदान करतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
तामिळनाडू, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्वयंपाक घरातील वस्तू, भांडे, कपडे, गृहकर्ज आणि नोकर्या अशा आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मोफत आश्वासनांची खैरात केली आहे. अण्णाद्रमुकनं सर्व कुटुंबांना अम्मा वॉशिंग मशीन, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तिला नोकरी, ज्यांना घरे नाहीत अशांना अम्मा गृह योजनेअंतर्गत मोफत घर, प्रत्येक कुटुंबाला सहा महिने मोफत गॅस सिलिंडर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यासोबतच शिक्षणावरील कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे.
तर द्रमुकचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी प्रत्येक कुटुंब चालवणाऱ्या महिलेला प्रति महिना एक हजार रुपये देण्याचं, बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रत्येत वर्षात दहा लाख नोकर्या देण्याचं, स्थानिक लोकांना नोकर्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देण्याचं तसंच इंधन, गॅस, दुधासह इतर वस्तूंच्या किमती कमी करण्याचं आश्वासन दिलं आहे.