पुलाच्या बांधकामास जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची तत्वतः मान्यता
मुंबई – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग ४० या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली आहे. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
खेडी भोकर पुलाच्या बांधकामासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुलाच्या बांधकामासाठी पुरवणी अंदाजपत्रकात खर्चाची तरतूद करावी तसेच पुलाच्या बांधकामाच्या कामाला तातडीने प्रशासकीय मान्यता देवून कामाला गती देण्याचे निर्देशही पाटील व चव्हाण यांनी दिले. पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. जिल्ह्यातील जळगावसह भुसावळ, यावल, चोपडा या चार तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या दळणवळणासाठी हा पूल महत्त्वाचा आहे.
शेतकऱ्यांना ठरणार वरदान
खेडी भोकर पूलाची अंदाजित किंमत सुमारे ११७ कोटी रुपये इतकी आहे. चोपडा – भोकर -जळगाव रस्ता हा राज्यमार्ग दर्जाचा असून दरवर्षी या ठिकाणी तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी ५० लक्ष रुपये खर्च येतो. तसेच पावसाळ्यात या रस्त्यावरील वाहतूक बंद राहते. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तात्पुरता पूल बंद झाल्यास हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी शेतकऱ्यांना व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. शिवाय खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी या पुलाचा मोठा फायदा होणार आहे.