नवी दिल्ली – बॉलिवूड चित्रपटाचे निर्माता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरूद्ध आयकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर सुडाचा आरोप केला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रकरणात उडी घेत आयकर विभागाच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, जेव्हा कर चुकवल्यामुळे आयकर विभाग कारवाई करतो, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, परंतु २०१३ मध्ये काही चित्रपट कलाकारांवर अशी कारवाई केली गेली, तेव्हा कुणीही यावर प्रश्न केला नाही. सीतारमण पुढे म्हणाल्या की, मी कोणत्याही खटल्याचा उल्लेख करणार नाही आणि कुणाचीही नावे वैयक्तिकरित्या घेणार नाही, पण पूर्वीच्या सरकारच्या काळात अशी कारवाई झाली त्यावेळी कोणीही याबद्दल काहीही बोलले नव्हते, परंतु आज हा मुद्दा विनाकारण बनविला जात आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह काही अन्य चित्रपट निर्मात्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा संदर्भ देऊन सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार शेतकरी समर्थक व्यक्तींवर छापे टाकते. तर आयकर विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, संबंधितांवर टाकलेले छापे हा प्राप्तिकर चोरीसंदर्भातील तपासाचा एक भाग आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबई व पुण्यात 30 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात अनेक बड्या व्यक्ति अडकल्या असल्याचे बोलले जात आहे.