नवी दिल्ली – तापमानातील वाढीमुळे २१ व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच हिमालयातील हिमनद्या दुप्पट वेगाने वितळत असून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे भारतासह शेजारील देशांना भविष्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड दयावे लागणार असून कोट्यावधी लोकांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
२०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका पर्यावरण विषयक अभ्यासात असे म्हटले होते की, भारत, चीन, नेपाळ आणि भूतान येथील ४० वर्षांच्या उपग्रह छायाचित्रांच्या अभ्यासानुसार हवामानातील बदलामुळे हिमालयीन हिमनद्या हळूहळू नष्ट होत असल्याचे दिसून आले आहे.जून २०१९ मध्ये सायन्स अॅडव्हान्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार १९७५ ते २००० या वर्षांच्या तुलनेत २००० पासून ते २०१९ या काळात हिमालयीन हिमनग दुप्पट वेगाने वितळत आहेत.
दरम्यान, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील संशोधक जोशुआ मोरेर म्हणाले की, हिमालयीन हिमनद्या या काळात किती वेगवान आणि का वितळत आहेत याविषयी हे चित्र अगदी स्पष्ट आहे. योग्य संशोधन व अभ्यासाने याची अचूक गणना केली असून गेल्या चार दशकांत हिमनद्यानी बर्फाचा सुमारे एक चतुर्थांश भाग गमावला आहे. या अभ्यासादरम्यान, संपूर्ण प्रदेशातील प्रारंभीच्या सॅटेलाइट इमेज आणि सद्य स्थितीतील छायाचित्रांमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो.