आग्रा – देशातील प्रेक्षणीय स्थळ आणि जगातील आठ आश्चर्यातील एक असेलेल्या प्रसिद्ध ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र ही अफवा असल्याचं आग्र्याच्या पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केलं आहे.
बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पर्यटकांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ताजमहालमध्ये जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते. एका अज्ञाताने फोन करून ताजमहालमध्ये स्पोटकं ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र ही अफवा असल्याचं नंतर स्पष्ट झालं.
ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती खोटी आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक ए. सतीश गणेश यांनी दिली. फिरोजाबाद इथल्या एका व्यक्तीनं फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनी त्या व्यक्तिला अटक केली आहे. बॉम्बची माहिती मिळताच ताजमहाल परिसरात सीआयएसएफ आणि पोलिसांना तैनात करण्यात आलं.
सैन्यभरती रद्द झाल्यानं नाराज होता तरुण
आग्राच्या लोहमंडी पोलिस ठाण्यात ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली होती. आग्रा इथले पोलिस आयुक्त शिवराम यादव म्हणाले, माहिती देणारा तरुण फिरोजाबाद इथला आहे. सैन्यभरती रद्द केल्याबद्दल त्याला राग आला होता. नंबर ट्रेस केल्यानंतर त्या तरुणाला शोधण्यात आले.