एमआयडीसीच्या वर्धापनदिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा
मुंबई – एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची (उपदान) मर्यादा १० लाखांहून १४ लाख करण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे २५० एकरांवर स्वयंपूर्ण असे इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ५८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या दोन महत्त्वाच्या घोषणा महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या.
कोरोना संकटात एमआयडीसीने उल्लेखनीय काम केले. गरजूंना अन्नधान्य वाटप केले. औरंगाबादमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले. मराठवाड्यातील पहिली व्हायरालॉजी लॅब सुरू केली. याचे सर्व श्रेय महामंडळाला जाते, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन म्हणाले की, कोरोनाकाळात सर्व क्षेत्रे ठप्प असताना केवळ उद्योग विभाग सतत काम करत होता. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात महामंडळाचे अस्तित्व आहे. लघु उद्योगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. २५ हजार कोटींचे सामजंस्य करार केले. महापरवाना, महाजॉब्ज, सीएम रिलिफ फंडला १६० कोटी रुपये मिळून दिले. ७५० टन धान्य कोरोनाग्रस्त भागात दिले.