नाशिक : तलवार घेवून दुचाकीवर फिरणा-या सिडकोतील त्रिकुटास सरकारवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत सीबीएस बसस्थानक परिसरात मिळून आले. संशयीतांच्या ताब्यातून धारदार तलवारीसह लोखंडी अँगल पट्टी आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ विनायक कापसे (३१, रा. दत्तचौक, सिडको), संदीप प्रकाश आठवले (१९, रा. पेलीकन पार्कसमोर, सिडको) आणि रोशन कांतीलाल मोरे (२१, बडदे मळा, सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहते. गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास भद्रकाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहाणे आणि होमगार्ड महाले यांना या टोळीबाबत माहिती मिळाली होती. त्यानी तात्काळ नियंत्रण कक्षास माहिती कळविल्याने संशयीत पोलीसांच्या हाती लागले. संशयीतांची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सीबीएस येथे पोहचले. पोलीस चौकशीत त्रिकुटाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी त्यांची अंग झडती घेतली असता एकाकडे तलवार तर दुस-याकडे लोखंडी अँगल पट्टी मिळून आली. या दोन शस्त्रांसह त्यांच्याकडील दुचाकी हस्तगत करण्यात आली असून ही कारवाई उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड, पोलिस कर्मचारी संदीप साळवे, रवींद्र लिलके, विजय कोकणे, तारेश धुळे आदींच्या पथकाने केली.