मालेगांव – शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन होत असल्याच्या तक्रारी वाढत असतांनाच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या खाजगी आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसोबतच आता अशा आस्थापना सहा महिन्यासाठी सील करण्यात याव्यात असे निर्देश उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी आढावा बैठकीत दिले.
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन होत असल्याच्या वाढत्या तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभुमीवर महसूल, पोलीस व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उप विभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी प्रातांधिकारी डॉ.शर्मा बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक प्रविण जाधव, लता दोंदे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, जगदीश बडगुजर, शाम बोरकुल, अब्दुल कादीर यांची संपूर्ण टिम तसेच महसूल, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पार्श्वभुमीवर काल सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी व पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून प्रभाग क्रं. 1 ते 3 मधील विनामास्क फिरणाऱ्या 42 नागरिकांसह चार खाजगी आस्थापनांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे 27 हजाराचा दंडही वसुल करण्यात आला. यावेळी बोलतांना प्रातांधिकारी डॉ.शर्मा म्हणाले, नागरिकांकडून दंड वसुलीचा शासनाचा उद्देश नसुन नागरिकांकडून आरोग्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. सध्या प्राथमिक स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात येत असून यापुढे कोरोनाचे संकट टळेपर्यंत अशा आस्थापना सील करण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोनाची संवेदनशिल परिस्थिती हाताळतांना सर्वसामान्य नागरिकांचा विचार करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास यापुढे कठोर निर्णय घ्यावे लागतील. असेही डॉ.शर्मा यावेळी म्हणाले