नाशिक – नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघात छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदारांना आपले कर्तव्य व हक्क यापुढे सहजतेने करता यावे, यासाठी मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करावी. यासाठी मतदाराने www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपले नाव छायाचित्रसह असल्याचे तपासावे किंवा १२५ नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघ कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, १२५ (पश्चिम) विधानसभा मतदार संघ यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, १२५ नाशिक (पश्चिम) विधानसभा मतदार संघात एकूण ३७५ मतदान केंद्र आहेत. याबाबत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत गृहभेटीसह सर्वेक्षण सुरू आहे. गृहभेटीदरम्यान यादी फोटो नसेलेले मतदार पत्त्यावर रहात नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मतदारांची नावे यादीतून कटाक्षाने वगळली जातील तसेच ज्यांच्या नावासमोर छायाचित्र नाही अशा मतदारांनी त्वरीत फोटोमागे नाव लिहुन कार्यालयात जमा करावेत असे मतदार नोंदणी अधिकारी, १२५ (पश्चिम) विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.