– शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विशेष प्रयत्न करावेत.
– नाशिक विभागात महाविद्यालय स्तरावर ३०४० अर्ज प्रलंबित
….
नाशिक – महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक भगवान वीर यांनी दिल्या आहेत.
पात्र असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारल्यास संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यावर प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे जे अर्ज त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत, अथवा ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रे अपुरी आहेत, अशा विद्यार्थ्याला त्रुटी पूर्ततेसाठी संपर्क साधून त्रुटी पुर्तता पूर्ण करून घेण्यात यावेत.
ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे अर्ज मंजूर झाले आहेत ; मात्र आधारकार्ड खात्याशी लिंक नसल्याने किंवा इतर तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्तीच्या रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणे प्रलंबित आहे. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ एनपीसीआय मॅपींग केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
नाशिक विभागात महाविद्यालयास्तरावर २०१९-२० या वर्षात ३०४० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक – १०१५, धुळे – ४४५, नंदुरबार – ५७, जळगांव – ४३३ व अहमदनगर – १०९० इतक्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. तेव्हा महाविद्यालयांनी तात्काळ त्यांच्या स्तरावरील अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे हस्तांतरित करावेत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास अशा महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा ही भगवान वीर यांनी दिला आहे.