आरोग्य पद भरती परिक्षेबाबत सोमवारी निर्णय
मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रिक्त पदे भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भात सोमवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.
काही काळ्या यादीतील कंपन्यांना परीक्षेची जबाबदारी देण्यात आली असल्यास अशा बाबी तपासून बघितल्या जातील व त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.
0000
ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने 11 ठिकाणी छापे टाकले असून 42 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तेथे कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
0000
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई – राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 217 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेडनेट, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी अशी कामे करण्यात येत आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता 111 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 42 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेसाठी 2 कोटी 17 लाख रुपये वितरित करण्यात आले असून 5 कोटी 41 लाख रुपये खर्चाची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली.
कोकणातील चक्रीवादळामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने 609 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. कोरोना संकटाच्या काळातही शासनाने फळबाग लागवडीचे काम सुरूच ठेवले असून येत्या वर्षभरात 50 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहितीही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.