ऑक्सिजन आणि रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा त्वरित सुरळीत होणे गरजेचे
नाशिक – कोविड 19 ने बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन आणि रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा त्वरित सुरळीत होणे गरजेचे असून, येत्या दोन चार दिवसात तसे न झाल्यास आमची इच्छा असूनही आम्ही रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थ ठरू अशी हतबलता हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.
नाशिक मधील कोरोना स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. बाधित रुग्णाची संख्या वाढतच आहे. मात्र त्या प्रमाणात ऑक्सिजन तसेच रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ती उपलब्ध करण्यासाठी आम्हाला धडपड करावी लागत आहे. त्याचवेळी रुग्णांकडेही लक्ष देताना प्रचंड दमछाक होत आहे.
गत वर्षाच्या लाटेत जिल्ह्यात फक्त ५० ते ६० कोविड सेंटर्स असताना परिस्थिती हाताबाहेर गेली नव्हती. आजमितीला जिल्ह्याभरात सुमारे २०० कोविड सेंटर्स असताना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. रेमडीसीव्हीरचे वितरण औषध प्रशासनाच्या देखरेखीखाली सुरु असताना त्याचे वाटपही असमान पद्धतीने होत असून, ठराविक मोठ्या हॉस्पिटल्सलाच जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. वितरण झाल्याचे ऑनलाईन दिसते मात्र आमच्यापर्यंत पोहचत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक आम्हाला वारंवार विचारणा करतात. त्यांची समजूत काढताना हॉस्पिटल प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. प्रशासन रोज वेगवेगळी पत्रकं काढत आहे. त्याऐवजी ऑक्सिजन आणि इंजेक्शन पुरवठा सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. इंजेक्शनचा साठा पुरेसा उपलब्ध झाल्यास रुग्णांची इंजेक्शनसाठी होत असलेली लूटही थांबेल.
बिला संदर्भात यापूर्वीच प्रशासनाने गाईड लाईन जाहीर केल्या आहेत. तरी सुद्धा रुग्णांचे नातेवाईक बिला बाबत हॉस्पिटल प्रशासनाशी अरेरावी करत असून, सोशियल मीडियावर बदनामी केली जात आहे. खरे तर रुग्ण संख्येचा वाढता आलेख बघता हॉस्पिटल स्टाफ आणि डॉक्टर्स यांच्यावरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यात जर अशी बदनामी होत असेल तर त्यांच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होऊन त्याचा फटका रुग्णांना बसू शकतो. त्यामुळे बिलाबाबत जर कुणाला शंका असली तर त्यांनी रीतसर तक्रार दाखल करावी. त्या तक्रारीला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ.त्यामुळे हॉस्पिटल्सची सोशियल मीडियावरील बदनामी थांबवून सर्वांनी या कठीण परिस्थितीत सहकार्य करावे असे आवाहन नाशिक हॉस्पिटल असोसिएशनतर्फे करण्यात आले. पत्रकार परिषदेस असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ राज नगरकर, सचिव डॉ सचिन देवरे, खजिनदार डॉ ज्ञानेशवर थोरात, डॉ शोधन गोंदकर, डॉ राहुल शिंदे, डॉ अमोल वाजे आदी उपस्थित होते