नवी दिल्ली ः मोबाईलवर बोलणं आणि त्यावर इंटरनेट वापरणं लवकरच महाग होणार आहे. १ एप्रिलपासून दूरसंचार कंपन्या दरांमध्ये वाढ करण्याच्या तयारीत असल्याचं रेटिंग एजन्सी इक्राच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.
कोरोना संकटात विशेषतः लॉकडाउन काळात वेगवेगळे क्षेत्र ठप्प झालेले असताना दूरसंचार कंपन्यांचा महसूल प्रतिग्राहक वाढला आहे. कंपन्यांचा वाढता खर्च लक्षात घेता हा महसूल जास्त नाही. त्यामुळे मोबाईल दर वाढवून त्याची भरपाई करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. यापूर्वी गेल्या वर्षी काही दूरसंचार कंपन्यांनी दरांमध्ये वाढ केली होती.
एडजेस्ट ग्रॉस रेव्हेन्यूची (एजीआर) थकीत रक्कम १.६९ लाख कोटी रुपये आहे. आतापर्यंत केवळ १५ टेलिकॉम कंपन्यांनी ३०,२५४ कोटी रुपये जमा केले आहेत. एअरटेलची थकीत रक्कम २५,९७६ कोटी, व्होडाफोन-आयडियाची ५०,३९९ कोटी आणि टाटा टेलिसर्व्हिसेसची १६,७९८ कोटी थकीत रक्कम आहे. कंपन्यांना १० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात आणि उर्वरित रक्कम पुढील वर्षी जमा करायची आहे.
4G मुळे कंपन्यांना फायदा
इक्राच्या रिपोर्टनुसार, दरांमधील वाढ आणि ग्राहक २जी वरून ४जीमध्ये रूपांतरीत झाल्यानं कंपन्यांना प्रतिग्राहकामागे मिळणार्या महसुलात वाढ झाली आहे. मधल्या काळात ही रक्कम २२० रुपये होऊ शकते. त्यामुळे पुढील दोन वर्षात दूरसंचार उद्योगाचा महसूल ११ ते १३ टक्के वाढू शकतो.