नीलेश गौतम, डांगसौंदाणे (ता. सटाणा)
तब्बल ८ महिन्यांच्या कालावधीनंतर येथील आठवडे बाजार पुन्हा भरल्याचे पहायला मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीने मंजुरी दिल्याने हा बाजार भरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या या बाजाराने परिसरात चैतन्याचे वातावरण मिळाले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात २२ मार्च पासून सगळीकडे बंद असलेला आठवडे बाजार अखेर सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विविध नियम व अटींचे पालन करीत हा बाजार सुरू करण्यात आला आहे. या परवानगीने व्यापारी वर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आज डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आठवडे बाजार सुरू केला आहे. पश्चिम आदिवासी भागातील ३८ खेडयाचे मुख्य बाजारपेठ असलेला डांगसौंदाणे आठवडे बाजार गेले आठ महिने बंद असल्याने मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. मंगळवारी भरणारा या बाजाराला पंचक्रोशीतील हजारो लोकांची उपस्थिती राहते शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचा सुट्टीचा दिवस असलेला मंगळवार गेले आठ महिने मात्र बंद होता.
कुठलीही गर्दी किंवा बाजार आवारात कोणीही फिरकत नसल्याने आठ महिने बाजार आवार सुनसान झालेले होते. काल झालेल्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नियम व अटी पाळत व्यापार्यांना आठवडे बाजारात बसण्यास परवानगी दिली आहे.आज व्यापारी वर्गामधे उत्साह दिसून आला. दुपारनंतर बाजाराने चांगले स्वरूप धारण केल्याने व्यापार्यांच्या आर्थिक उलाढाली ला काहीअंशी हातभार लागला.
गेली अनेक दिवस बाजारावर अवलंबून असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या दुकानदारांना आज खरी दिवाळी आल्याचा आनंद झाला.
आता यात्रेची उत्सुकता
या भागात वर्षभरातून एकदाच दिवाळीत भरणारी डांगसौंदाणे परिसरातील बजरंगबली यात्रा उत्सव भरतो की नाही याची चर्चा व्यापारी वर्गांमध्ये सुरू आहे. तीन दिवस भरणाऱ्या यात्रेला ही मोठे स्वरूप येते प्रशासणाच्या निर्णयाकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागून आहे. आज सुरू झालेल्या आठवडे बाजारामुळे आदिवासी गोरगरीब शेतमजूर बाजारात मनसोक्त खरेदी करताना दिसून आले.
—
गेली ८ महीने डांगसौंदाणे आठवडे बाजार बंद होता. कोरोना महामारी पसरु नये. म्हणून ग्रामपंचायत प्रशासन सतत प्रयत्नशील होते. त्यात यश आले ही मात्र गेली अनेक दिवस बाजारावर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांचा विचार करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनाने पालन करीत बाजार सुरु केला आहे.
– सुशीलकुमार सोनवणे, उपसरपंच, डांगसौंदाणे
—
आठवडे बाजार सुरु झाला ही आमच्या व्यापारी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात प्रशासनाचे सर्व नियम पाळून यापुढे आम्ही व्यवसाय करणार आहोत.
– संजय नेरकर, व्यवसायिक