नाशिक – लाच देणे आणि घेणे गुन्हा असला तरी त्याची कुठलीही परवा सरकारी अधिकाऱ्यांना नसल्याचे निष्पन्न होत आहे. सुरगाणा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे बील अदा करण्यासाठी तब्बल ७० हजार रुपयांची लाच मागणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात आला आहे. गंगाराम सीताराम भोये (सहाय्यक अभियंता श्रेणी २) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. भोये याने रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे तब्बल ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर या कंत्राटदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. भोये याने रक्कम मागितल्याचे आणि ती स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळए एसीबीच्या पथकाने भोये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बहाद्दरचे धाडस
विशेष म्हणजे, भोये हा यापुर्वीही लाच घेताना पकडला गेला आहे. ७.९.२००९ रोजी भोये हा १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आला होता. त्यावेळीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या घटनेतून कुठलाही धडा न घेता त्याने पुन्हा लाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.