नवी दिल्ली – नागालँड राज्य स्थापनेच्या ५८ वर्षानंतर प्रथमच विधानसभेत राष्ट्रगीत म्हणून अधिवेशनाला सुरूवात झाली. या ऐतिहासिक घटनेकरिता सुमारे आठवडाभरापूर्वी तयार झाली होती, विधानसभेच्या अधिवेशन सत्रापूर्वी राज्यपाल आर.एन. रवि यांच्या अभिभाषणाच्या आधी राष्ट्रगीत सुरू झाले होते.
१ डिसेंबर १९६३ रोजी नागालँड राज्य अस्तित्वात आले. जानेवारी १९६४ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकांनंतर पहिले सरकार अस्तित्वात आले आणि ११ फेब्रुवारी १९६४ रोजी पहिली विधानसभा स्थापन झाली. परंतु असे असूनही ‘जन गण मन’ हा सूर राज्य विधानसभेत कधीच उमटलाच नाही.
तथापि, विधानसभा आयुक्त डॉ. पी.जे. अँटनी यांचे म्हणणे आहे की, विधानसभेत राष्ट्रगीत गाण्यास बंदी नव्हती. असे असूनही येथे राष्ट्रगीत का गायले गेले नाही ? याबाबत कोणताही आदेश नाही. यावेळी विधानसभेचे सभापती शेरिंगेन लाँगकुमेर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीताचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मुख्यमंत्री निफियू रिओ यांच्या नेतृत्वात सरकारची संमती मिळाली.
यानंतर दि. १२ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाच्या सुरूवातीस राज्यपालांच्या आगमनानंतर प्रथमच राष्ट्रगीत वाजविण्यात आले आणि मास्क घातलेले सर्व आमदार त्याचा सन्मान करण्यासाठी एकत्र उभे राहिले. नागालँड विधानसभा भवनात प्रथमच उभे असलेल्या सर्व आमदारांचा ‘जन गण मन’ या प्रतिध्वनीचा आणि सन्मानाच्या ऐतिहासिक दृश्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनी हा व्हिडीओ शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे .