मुंबई – मूळ भारतीय असलेल्या एका तरुणाला ब्लॅकमेलिंग, हेरगिरी आणि सायबर गुन्ह्यात ब्रिटीश न्यायालयाने ११ वर्षांचा कारावास सुनावला आहे. या युवकावर तब्बल ५७४ तरुणींचे कॉम्प्युटर अकाऊंट हॅक करून त्यांचे शोषण करण्याचा आरोप सिद्ध झाला आहे. बासिलडॉन क्राऊन न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
२७ वर्षीय आकाश सोंधी याने २६ डिसेंबर २०१६ पासून १७ मार्च २०२० पर्यंत शेकडो सोशल मिडीया अकाऊंट हॅक केले आणि तरुणींचे शोषण केले. आकाशने विशेषतः स्नॅपचॅटला टार्गेट केले होते. १६ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणी त्याच्या रडारवर होत्या. एसेक्स काऊंटीत चेफोर्ड हंड्रेडमध्ये राहणारा आकाश याने तरुणींना त्यांची नग्न छायाचित्रे मागितली. तसे केले नाही तर त्यांची इतर छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. यातील सहा मुलींनी त्याचे म्हणणे एकले देखील. मात्र या सहा व इतर शेकडोंना भावनिक व मानसिक धक्का बसला. एकीने तर आत्महत्या देखील केली. जवळपास १२ मुलींनी तक्रार केल्यानंतर १९ मार्चला पोलिसांनी आकाशच्या घरावर छापा मारून त्याला अटक केले. त्याने ६५ गुन्हे मान्य केले आहेत, हे विशेष.