भोपाळ – ३ डिसेंबर १९८४ ची रात्र मध्यप्रदेश ची राजधानी भोपाळ मधील हजारो नागरिकांच्या जीवनातील अंतिम रात्र ठरली. युनियन कार्बाईड संयंत्रातून विषारी वायूची गळती झाल्यामुळे हजारो लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. यात जवळपास दीड लाख लोक अपंग झाले तर बावीस हजार जण मृत्युमुखी पडले. ही जगाच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते.
सरकारी आकडेवारीनुसार, या दुर्घटनेत काही तासात तीन हजार लोकांचा जीव गेला. मात्र प्रत्यक्षदर्शी तसेच याविषयावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या मते सरकारने मूळ आकडा लपविला असून जवळपास बावीस हजार लोकांचा यात मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर अनेक वर्षांपर्यंत पीडित लोकांचे मृत्यू सत्र सुरूच होते.
यूनियन कार्बाइड संयंत्रातून तब्बल ४० टन विषारी वायूची गळती झाली होती. यामुळे दिव्यांग झालेले हजारो लोक आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्या रात्रीची आठवण करून आजही त्यांच्या मनाचा थरकाप उडतो.
या घटनेमुळे सर्वाधिक प्रभावित झाले होते ते प्रस्तुत कारखान्याच्या भोवतालच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गरीब लोक. हे सर्व जण आपल्या रोजी रोटीच्या शोधार्थ दूरदूरच्या गावांतून भोपाळला आलेले होते. विषारी वायुच्या गळतीमुळे केवळ काही मिनिटांत हजारो लोकाना प्राणास मुकावे लागले.
या घटने नंतर केवळ आठ तासात भोपाळ शहराला विषारी वायूपासून मुक्त मानले गेले तरी अजूनही या धक्क्यातून नागरिक सावरलेले नाहीत. अजूनही भोपाळ मधील जलस्त्रोत विषारी असल्याचे सांगितले जाते. अटल अयुब नगर मधील हँड पंप ला १९९९ पर्यंत विषारी पाणी येत असल्याच्या नोंदी आहेत. विषारी वायूचा परिणाम इतका भयंकर होता की आजही अनेक नवजात बालक कॅन्सरग्रस्त म्हणून जन्म घेतात.