नवी दिल्ली : रस्त्यावरुन जात असलेल्या प्रत्येक दुचाकीस्वारात मी माझ्या मुलाची प्रतिमा पाहतो. दुसर्याचा मुलगा अपघातात बळी पडणार नाही, म्हणून मी संपूर्ण जबाबदारीने आणि स्वंयस्फूर्तीने वाहतूक नियंत्रित करीत या चौकात उभा आहे. असे सांगत दिल्लीतील गंगाराम नावाचा वृद्ध जणू काही डोळ्यातील हावभावाने त्याची संपूर्ण जीवन कहाणी सांगत असतो. कारण तब्बल ३२ वर्षांपासून विनावेतन तो वाहतूक पोलीसांचे काम करत आहे.
नवी दिल्लीतील अत्यंत रहदारीच्या सीलमपूर चौकातून आपल्याला जायचे असेल तर, वाहतूक पोलिसांचा एक सैल गणवेश परिधान केलेला ७५ वर्षीय वृद्ध हातात पोलीसांची काठी घेऊन रहदारी नियंत्रित करताना दिसतो. गंगाराम नामक या व्यक्तीच्या हावभावाने रहदारी थांबते आणि पुढे जाते. या रस्त्याने जाणारे बहुतेक वाहनचालक गंगारामला चांगले ओळखतात. वास्तविक वृद्ध गंगारामच्या धाकट्या मुलाला त्याच चौकात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आता अपघातात इतर कोणाचा मुलगा मृत्यूमुखी पडू नये म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत इथल्या रहदारीवर नियंत्रण ठेवतात. वाहतूक पोलिस अधिकारीदेखील त्याची विचारणा करतात .
गंगाराम यांचे सीलमपूरमध्ये त्याचे टीव्ही दुरुस्तीचे दुकान होते. पोलिस बरेचदा त्यांच्या दुकानात वायरलेस सेट इत्यादी दुरूस्ती करण्यासाठी येत असत. त्यांचा ४० वर्षीय मुलगा मुकेशही त्याच्यासोबत काम करायचा. ट्रॅफिक पोलिस कर्मचार्यांशी चांगल्या संबंधांमुळे प्रोत्साहित होऊन त्याने ३२ वर्षांपूर्वी वाहतूक नियंत्रक ( ट्रॅफिक वॉर्डन ) साठी अर्ज भरला आणि आयकार्ड त्याला मिळाले होते. सुरुवातीला त्याने सकाळ आणि संध्याकाळ वेतन न घेता वाहतूक नियंत्रण करण्यास सुरवात केली.
याच दरम्यान, सुमारे आठ वर्षांपूर्वी त्याचा मुलगा मुकेशला सीलमपूर चौकात ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे गंगारामची पत्नी ममता देवी यांचेही निधन झाले. गंगारामच्या सूनेला एका खासगी रुग्णालयात नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी स्वत: सावरले आणि सीलमपूर चौकात सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत विनामूल्य सेवा सुरू केली.
गंगारामचा त्याग आणि कामगिरी पाहून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गांधी नगरमध्ये एका कार्यक्रमात पगडी घालून त्याचा गौरव केला. याव्यतिरिक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमांमध्ये त्याला अनेकदा सन्मानित करण्यात आले. एकदा वाहतूक पोलिस सहआयुक्त यांनी चौकात गाडी थांबविली आणि यांचा सन्मान करण्यासाठी स्वतःची कॅप परिधान केली. गंगारामला आता पर्यंत अनेक ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र मिळाले आहेत.
वाहतूक पोलिस कर्मचारी त्यांना थोडी आर्थिक मदत करतात. घराचा खर्च सूनच्या पगारावर चालतो. काही युवक आपल्या वडिलांप्रमाणेच प्रेम करत त्यांना घरून डबा आणतात आणि त्यांना खायला घालतात. परिसरातील लोक नमस्कार करूनच पुढे जातात. काही लोक त्यांच्याबरोबर सेल्फीही घेतात