वाराणसी – तब्बल १०० वर्षांपूर्वी चोरून कॅनडा येथे नेण्यात आलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती लवकरच काशी येथे आणण्यात येणार आहे. कॅनडा सरकारने ही मूर्ती भारतीय अधिकाऱ्यांकडे १९ नोव्हेंबर रोजी सुपूर्द करण्यात आली आहे. या मूर्तीच्या एका हातात खीर तर दुसऱ्या हातात अन्न आहे. ही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात सापडली आहे.
१९ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या वर्ल्ड हेरिटेज सप्ताहात भारतीय कलाकार दिव्या मेहरा यांची नजर या मूर्तीवर गेली, आणि त्यांनी हा विषय लावून धरला. अधिक माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलं की, मॅकेंझी यांनी १०० वर्षांपूर्वी भारताला भेट दिली होती. त्यावेळी ते वाराणसी येथेही आले होते. अन्नपूर्णा मंदिरातून या मूर्तीची चोरी करून ती तेथे पोहोचवण्यात आली असावी असा अंदाज आहे.
रेजिना विद्यापीठातून मिळालेली ही मूर्ती विद्यापीठाचे उपकुलगुरू थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चाधिकारी अजय बिसारिया यांना एका व्हर्च्युअल कार्यक्रमात या मूर्तीची माहिती दिली. या बैठकीला मॅकेन्झी आर्ट गॅलरीचे तसेच कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय पुरातत्त्व अधिकारी डॉ. सुभाषचंद्र यादव यांनी सांगितले की, ही मूर्ती भारतात आल्यानंतर नंतरची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कर्नाटकमधून चोरीला गेलेल्या मूर्ती काही दिवसांपूर्वी जेंव्हा भारतात आणण्यात आल्या तेंव्हा त्या कर्नाटक सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यामुळेच ही मूर्ती आता काशी येथे आणण्यात येणार आहे.