नवी दिल्ली : सिनेमागृहे आता कुठे उघडायला सुरुवात झाली असली तरी ओटीटी प्लॅटफॉर्मने या काळात मनोरंजन क्षेत्राला चांगलाच हात दिला. त्यामुळे यावर्षीच नव्हे तर गेली कित्येक वर्षे रखडलेले चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. यातीलच एक आहे, ‘अन्वर का अजब किस्सा’. सात वर्षांनी हा चित्रपट शुक्रवारी इरॉस नाऊवर रिलीज झाला. हा चित्रपट म्हणजे एका गुप्तहेराची कथा आहे. या फिल्मचा ट्रेलर दाखवताना इरॉस नाऊ ने आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे की, आजवर तुम्ही गुप्तहेर कथा एेकल्या असतील, पण गुप्तहेराची कथा पाहिली आहे का ? स्वतःच्याच शोधात निघालेल्या या गुप्तहेराच्या भूमिकेत आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याच्याशिवाय पंकज त्रिपाठी, निहारिक सिंह आणि अनन्या चॅटर्जी यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. २०१३ मध्ये हा चित्रपट लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता, पण भारतात काही तो प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांनी कहाणी आणि गॅंग ऑफ वासेपूर या चित्रपटांमधील नवाजुद्दीनचा अभिनय पाहून त्याला या चित्रपटात संधी दिली. ओटीटीवर रिलीज होणारा हा नवाजचा पहिलाच चित्रपट असला तरी यंदा त्याच्या तीन वेबसिरीज या प्लॅटफॉर्मद्वारे प्रदर्शित झाला आहेत.