ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका….
इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा – भाग ४
तब्बल सहा पेक्षा अधिक संघटनांकडून तपासाला वेग
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
एचएएलमधील हेरगिरीच्या प्रकरणाचा तपास तब्बल सहा पेक्षा अधिक संघटनांकडून सुरू असल्याची बाब समोर येत आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे आणि त्याचे विविध कंगोरे उघड करण्यासाठी या सर्व संघटना एकत्रितरित्या कार्य करीत असल्याचे सांगितले जात आहे.
ओझर एचएएलमधील कर्मचारी दीपक शिरसाठ हा हेरगिरीच्या प्रकरणात सापडला आहे. एटीएसच्या ताब्यात सध्या तो आहे. लढाऊ विमानाच्या निर्मितीशी संबंधित गोपनीय माहिती त्याने पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय ला दिल्याचा संशय आहे. त्याच्याकडे जप्त झालेल्या मोबाईल, मेमरी कार्ड आणि सिमकार्डवरुन सध्या माग काढला जात आहे. या तपास कार्यात तबाबल सहा पेक्षा अधिक संघटना सक्रीय असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी संघटना (एटीएस), डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (डीआयए), राज्य गुप्त वार्ता विभाग (सीआयडी), रॉ, आयबी, सीबीआय आदींचा त्यात समावेश आहे. मुख्य जबाबदारी ही एटीएसवर असली तरी अन्य संघटना देशाच्या संरक्षण आणि हिताच्या बाबीसाठी विविध बाबींवर काम करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केवळ शिरसाठची चौकशी करण्यापूरता हे हेरगिरी प्रकरण सिमीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आयएसआयचा नक्की हेतू काय आहे, ते कुठला मार्ग अवलंबवत आहेत, त्यांनी किती जणांवर आपले जाळे फेकले आहे, हनी ट्रॅपसारखेच हत्यार वापरले जात आहे की इतरही मार्गांचा वापर केला जात आहे, देशभरात कुठे कुठे त्यांचे जाळे पसरलेले आहे, अशा विविध बाबींचा उलगडा या माध्यमातून या तपास संस्थांना करायचा आहे. त्याद्ववारे मिळणाऱ्या माहितीतून देशविघातक कारवायांना रोखण्याची रणनीती आखली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शिरसाठ याची पोलिस कोठडी रविवारी (१८ ऑक्टोबर) संपत आहे. पुढील तपासासाठी ही कोठडी न्यायालयाकडून वाढून मिळण्याची दाट चिन्हे आहेत. तपास करणाऱ्या सर्व संघटनांच्या अधिकाऱ्यांची बैठकही मुंबईत झाल्याचे सांगितले जात आहे. याच बैठकीत तपासाची दिशा आणि त्याची जबाबदारी निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे हेरगिरीच्या या प्रकाराचा योग्य तो छडा लावण्यासाठी तपास संस्था गतिमान पद्धतीने कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
(क्रमशः)