नवी दिल्ली – भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यास १ कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) अटक केली आहे. याशिवाय सीबीआयने देशभरातील २० ठिकाणी छापेदेखील चालवले आहेत.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेतील १९८५ च्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी महेंद्रसिंग चौहान यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. सीबीआय अधिकाऱ्यांनी लाच रक्कम वसूल केली आहे. त्याचा कल्याणीनगरमधील १ कोटी ९९ लाखांचा फ्लॅट असून आणखी काही बेहिशोबी संपत्ती आहे. ईशान्य सीमेवरील रेल्वे (एनएफआर) प्रकल्पांसाठी करार करण्यास मदत केल्याचा आरोप चौहान यांच्यावर आहे. चौहान हे आसामच्या मलिगांव येथील एनएफआर मुख्यालयात तैनात होते. दरम्यान, सीबीआयने दिल्ली, आसाम आणि उत्तराखंडसह देशातील २० ठिकाणी छापे टाकले आहेत.