परप्रांतीय युवकास लुटले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या एका परप्रांतीय युवकास दुचाकीस्वार दुकलीने पाठलाग करीत मारहाण करून लुटल्याची घटना तपोवनरोड भागात घडली. या घटनेत युवकाचा मोबाईल भामट्यांनी बळजबरीने काढून घेतला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनी जगदिश सहाणी (२५ मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली जेजूरकर मळा,तपोवन रोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सहाणी मंगळवारी (दि.१९) रात्री तपोवनरोडने संगम स्विटच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. दोघा पल्सरस्वारांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी त्याने बचावासाठी डिस्नी बेकरीकडे धाव घेतली असता संशयीतांनी त्यास पकडून बेदम मारहाण केली. यावेळी बळजबरीने त्याच्या खिशातील महागडा मोबाईल काढून भामट्यांनी धूम ठोकली. अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.
…..
हॉस्पिटल आवारातून दुचाकी लंपास
नाशिक : हॉस्पिटल परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना मानवता क्युरी हॉस्पिटल परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नामदेव कहांडळ (रा.शिलापूर – ओढा ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कहांडळ गेल्या सोमवारी (दि.११) कामानिमित्त शहरात आले होते. मानवता क्युरी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली एमएच १५ बीजी २४७९ पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.
……
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६० वर्षीय वृध्द ठार झाले. हा अपघात वर्दळीच्या द्वारका सर्कल भागात झाला. याप्रक्रणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
किसन लाल सैंदाणे (रा.खवशी ता.अमळनेर जि.जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सैंदाणे बुधवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास द्वारका पोलीस चौकी समोरून रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. जखमी अवस्थेत पत्नी जेठाबाई यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता रात्री उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. अधिक तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.
……
आडगावला एकाची आत्महत्या
नाशिक : आडगाव येथील शिंदे गल्लीत राहणा-या ३३ वर्षीय इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निशांत बाळकृष्ण कुमावत असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. कुमावत यांनी बुधवारी (दि.२०) रात्री आपल्या घराच्या तिस-या मजल्यावरील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
….