नाशिक – जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ हजार ४२७ प्रतिबंधित क्षेत्रात ४ हजार १३१ टिमद्वारे ६ लाख ४ हजार ८४२ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. त्यात २४ लाख १४ हजार ५४७ लोकांची तपासणी करण्यात आली. त्याद्वारे १ लाख १९ हजार ७५४ संशयित आढळले आहेत. ७० हजार ४४४ रुग्णांना उपचार देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनस्तरावर राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असून सर्व शासकीय विभाग व जनतेच्या समन्वयाने ही मोहिम यशस्वी करुया, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात आयोजित बैठकित जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. आर. जे. चौधरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे प्रत्येक कुंटुबाचे सर्वेक्षण करुन कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करण्यात येणार असून आजारी तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. ही मोहिम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने आरोग्य व संबंधित विभागांबरोबरच इतरही विभागांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे यापुर्वी ज्या विभागांनी कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांची सेवा रद्द केली होती त्या सर्व विभागांची सेवा घेण्याबाबत शासनस्तरावर कळविण्यात येणार असल्याचेही मांढरे यांनी बैठकित सांगितले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम ग्रामीण भागात राबवितांना आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून याबरोबरंच नगरपालिका व नगरपरिषद व महिला व बाल कल्याण विभागाची मदतही घेण्याबाबतची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबवितांना अधिक क्षमतेने काम करणे आवश्यक आहे. परंतु काम करत असतांना प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घ्यावी असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.