नवी दिल्ली – ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देणाऱ्या जिओने नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात केली आहे. आतापर्यंत जिओ टू जिओ फ्री आणि जिओ टू नॉन जिओ काही हजार मिनिटे फ्री असे जिओचे प्लॅन्स होते. पण यापुढे कोणत्याही नेटवर्कला तुम्ही निःशुल्क कॉलिंग करू शकता. रिलायन्स जिओने नवीन वर्षानिमित्त इंटरकनेक्ट युसेज चार्ज अर्थात आययुसी रद्द केले आहेत. यामुळे आता ग्राहक नॉन जिओ ग्राहकांशी देखील तासनतास बोलू शकतात. दरम्यान, ट्रायच्या आदेशानंतर हे आययुसी शुल्क रद्द करण्यात आले आहे. जिओने ३१ डिसेंबर २०१९ रोजी आययुसी शुल्क लागू केले होते.
गेम खेळून जिंका पैसे
जिओ लवकरच एका ऑनलाइन गेमिंग टूर्नमेंट, गेमिंग मास्टर लाँच करणार आहे. मीडिया टेक या कंपनीसोबत लाँच होणारी ही टूर्नमेंट ७० दिवसांची असेल. यासाठी सव्वा लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर ग्रँड फिनालेच्या विजेत्याला ३ लाख रुपये रोख दिले जाणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. जिओ गेम प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल. १० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार असून १२ जानेवारीपासून टूर्नमेंट सुरू होईल.