नवी दिल्ली ः लडाखच्या सीमेवर पँगोंग जलाशयाच्या उत्तर किनार्यावरील फिंगर फोर क्षेत्रातून चीनच्या सैन्यानं माघार घ्यायला सुरुवात केली आहे. या क्षेत्रात त्यांनी केलेलं बांधकाम पाडण्यासही सुरुवात केली आहे. भारत आणि चीनदरम्यान झालेल्या करारानुसार, चीनी सैन्याकडून माघार घेणं सुरू आहे. गेल्या वर्षी घुसखोरी करून चिनी सैन्यानं जैसे थे परिस्थिती बदलली होती. दोन्ही देशांदरम्यान सैन्य माघारीच्या करारानुसार, फिंगर आठच्या पुढील सिरीजाप चौकीवर चीनला सैन्य घेऊन जायचे आहेत. तर भारताला फिंगर टू-थ्रीदरम्यान स्थित आपल तळ धन सिंह थापावर परत यायचं आहे.
करारानुसारच सैन्य माघारी
या भागात गेल्या अनेक वर्षांपासून भारताची चौकी आहे. दोन्ही देशाचे सैन्य गस्त घालणे आणि इतर हालचाली बंद ठेवणार आहे. पॅगोंग जलाशयाच्या किनार्यावरील पर्वताची आकृती हाताच्या बोटांप्रमाणे दिसते. त्यामुळे त्याला फिंगर असं म्हटलं जातं. या फिंगरची संख्या आठ आहे. फिंगर आठपर्यंत आपलं क्षेत्र असल्याचा दावा भारताकडून केला जातो. तर फिंगर चारपर्यंतच्या दाव्यावरून चीननं वाद निर्माण केला आहे. पॅगोंग जलाशयाच्या उत्तर किनार्यावर फिंगर ४ आणि फिंगर ८ च्या मध्ये आठ किलोमीटरमधील भागात दोन्ही देशांचे सैन्य भिडले आहेत.
सैन्य येथे परत येणार
फिंगर चारमधून चिनी सैन्याची संख्या बरीच कमी झाल्याचं एका वरिष्ठ अधिकार्यांनं सांगितलं. चिनी सैन्य आपल्या बोटीसुद्धा माघारी घेत आहे. लाइन ऑफ कंट्रोलवर जैसे थे स्थिती बदलण्यासाठी चिनीच्या सैन्यानं फिंगर चार आणि पॅगोंग जलाशयाच्या दक्षिण दिशेला आपल्या फौजा आणि साहित्य तैनात केलं होतं. गेल्या वर्षी चीननं फिंगर आठच्या पुढे येऊन जलाशयामध्ये बोटी तैनात केल्या होत्या. सर्व सैन्य माघारीनंतर राजकीय आणि सैन्यामधील चर्चेच्या माध्यमातून सहमती झाल्यानंतरच गस्त पुन्हा सुरू केली जाईल.
पॅगोंग जलाशयाच्या दक्षिणेस आमनेसामने उभं ठाकलेलं दोन्ही देशाचं सैन्य माघार घेत आहे. या ठिकाणी दोन्ही देशांचे रणगाडे फक्त १०० मीटरच्या अंतरावर उभे होते. गेले दहा महिने दोन्ही देशांचे सैन्य एलएसीवर तैनात होतं. पॅगोंग जलाशयाच्या उत्तर किनार्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात चिनी सैन्यानं घुसखोरी केल्यानंतर वाद वाढत गेला. हळूहळू हा वाद इतर क्षेत्रातही पसरला. भारतानं दक्षिण किनार्यावर आपली समारिक स्थिती भक्कम केली. हीच गोष्ट चीनला शेवटपर्यंत खटकत होती.